बोधेगावातील पुजारी हत्येप्रकरणी संतापाची लाट – हिंदुत्ववादी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

शेवगाव (प्रतिनिधी): बोधेगाव (ता. शेवगाव) येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिरात पुजारी भगवान दहातोंडे यांची निर्घृण हत्या प्रजासत्ताक दिनी करण्यात आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या क्रूर हत्येच्या निषेधार्थ विविध स्तरांतून आवाज उठवला जात आहे. मात्र, हिंदुत्वाचे रक्षण करण्याचा दावा करणारे नेते या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसनराव चव्हाण यांनी मृत पुजाऱ्याच्या नागलवाडीतील कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वन केले. यावेळी जय भगवानबाबा महासंघाचे बाळासाहेब सानप उपस्थित होते.
हत्या पूर्वनियोजित – पोलिसांच्या भूमिकेवरही संशय
प्रा. किसन चव्हाण यांनी हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध करताना सांगितले की, “या हत्याकांडात केवळ एक आरोपी नाही, तर त्याला सहकारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनीही या प्रकरणाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने मृतदेहाची मोठी हेळसांड झाली.”
त्यांनी पुढे असेही प्रश्न उपस्थित केले की, “फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या पुरोगामी पक्षांचे नेते आता कुठे आहेत? हा पुजारी दलित समाजातील असल्याने या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का?”
पीडित कुटुंबाला मदतीचा हात
या वेळी बाळासाहेब सानप यांनी दहातोंडे कुटुंबीयांना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच, या प्रकरणातील सर्व दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान जय भगवान महासंघाचे गणेश साबळे, बाबासाहेब नरवडे, काका पाटेकर, वंचित बहुजन आघाडीचे शाहूराव खंडागळे, सुनिल खंडागळे, अरुण झांबरे, बाळासाहेब ढाकणे, गोरख तुपविहिरे यांसह असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकार आणि पोलिस प्रशासनाला कडक इशारा
या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण असून, तपास यथाशक्ती होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.