वाशिम येथे पत्रकार दिवस उत्साहात साजरा .
वाशिम दि. येथील पत्रकार भवना मध्ये दि.६जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित जिल्हा पत्रकार संघाचे वतीने जिल्हा स्तरीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, परभणी येथील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक,पत्रकार डॉ .आसारामजी लोमटे,ज्येष्ठ पत्रकार विश्वास वाल्हे,जे. डी खुणे हे होते.सर्व प्रथम दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनातून लोमटे म्हणाले की पत्रकारिता करतांना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवावे. आजचा दिवस हा आत्मपरीक्षणाचा व अंतर्मुख होण्याचा आहे . सर्व सामान्य कष्टकरी ,राबलेल्या मानसांच्या समस्या शासन दरबारी पोहोचविण्याचे कार्य आपण केले पाहिजे त्या साठी आपल्या आजूबाजूच्या वास्तवा कडे बारकाईने पाहणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे.निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला.
विविध घटना घडामोडी वर प्रकाश टाकुन त्या उजागर करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची समाजाने योग्य ती दखल घ्यायला हवी असे ते म्हणाले.जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात माधवराव अंभोरे यांनी वाशिमच्या पत्रकारितेचा इतिहास मांडून पत्रकारांच्या प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी असे मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे अनुषंगाने विश्वास वाल्हे व मानोरा तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार जे.डी खुणे यांचा सत्कार करण्यात आला.