गद्दारांच्या टोळीने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करून टाकलाय, विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक राज्याध्यक्ष तथा शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आज रोजी राज्यातील मान्यवरांचा व शिक्षकांचा “सन्मान कर्तुत्वाचा २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३०० हून अधिक शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते.
शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आयोजित केलेल्या शिक्षकांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्याचा विनायक राऊत यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी आजच्या शिक्षण क्षेत्राबाबत खंत व्यक्त करीत राज्याला लाभलेले एक उपमुख्यमंत्री यांनी नुकतेच पीएचडी करून काय दिवे लावणार आहात अशा प्रकारचे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. मात्र हे वक्तव्य ऐकून कर्मवीर भाऊराव पाटील यांना देखील खंत वाटली असेल की माझ्या महाराष्ट्रात असे अडाणी उपमुख्यमंत्री आहेत. पीएच.डीचं महत्त्व अजित पवारांना कळणार नाही, त्यांना केवळ सत्तर हजार कोटींचे महत्व कळेल, त्याच बरोबर बेईमानींचे महत्व कळेल शब्दात खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार यावेळी घेतला.
तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सध्याच्या राजकारणात या गद्दारांच्या टोळीने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे. सगळ्या शिक्षकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, आणि जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून टाकायच्या आणि सगळ्या शाळांची प्रॉपर्टी अदानी सारख्या उद्यागपतींच्या घशातघालायची अशा प्रकारचा कुटील डाव सध्या महाराष्ट्रात सुरू असल्याची सणसणीत टीका देखील त्यांनी यावेळी केली.