2151 मते मिळालेल्या डॉ. प्रशांत पडोळेना उमेदवारी देवून नाना पटोले का पळाले..?


2151 मते मिळालेल्या डॉ. प्रशांत पडोळेना
उमेदवारी देवून नाना पटोले का पळाले..?

भंडारा : 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहिलेले प्रशांत पडोळे हे केवळ 2151 मते घेवून 8 व्या क्रमांकावर होते. अशा पडोळेना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी कशाच्या आधारावर दिली असेल, असा सवाल भंडारा गोंदियाची जनता विचारू लागली आहे. मात्र, या मतदार संघातून स्वतः नाना पटोले का पळाले असतील, तसेच त्यांनी दोन अर्ज कुणासाठी घेवून ठेवले आहेत, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले आज प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवण्यात त्यांचा सहभाग असू शकतो. मात्र, भंडारा गोंदिया मतदार संघातून नाना पटोले यांनी निवडणूक लढवावी अशी काँगेस कार्यकर्त्यांची भूमिका असताना नानांनी हा आत्मघातकी निर्णय का आणि कुणासाठी घेतला असेल, असा सवाल कार्यकर्तेच विचारू लागले आहेत.

काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँगेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, डॉ. निंबार्ते, माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नावांची जोरदार चर्चा या मतदार संघात असताना डॉ. प्रशांत पडोळे यांचे नाव समोर आल्याने नाना पटोले निवडणूक रिंगणातून माघारी हटल्याचे बोलले जात असून, कुणासाठी आणि कशासाठी त्यांनी ही खेळी केली असेल, याची चर्चा मतदारसंघात आहे.

Advertisement

विदर्भात सहकार महर्षी म्हणून ओळख असलेल्या दिवंगत यादवराव पडोळे हे पटोले यांचे गुरू आहेत. त्यामुळे त्यांनी हे नाव पुढे केले असण्याची शक्यता आहे. मात्र, पडोळे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर साकोली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना केवळ २१५१ मते पडली होती. त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

लाखनी तालुक्यातील पालांदुर जवळील घोडेझरीमधून त्यांना केवळ १२ मते मिळाली होती. असा दुबळा उमेदवार देवून त्यांना बळीचा बकरा ते का बनवत असतील? हा डमी उमेदवार दिल्याची चर्चा या भागात आहे. दरम्यान, नाना पटोले आतून भाजपचे काम करीत आहेत की काय असे वाटावे अशी ही उमेदवार निवड असल्याची टीकाही त्यांच्यावर होत आहे.

नाना पटोले यांनी दोन उमेदवारी अर्ज घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे नानांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशीही चर्चा विदर्भात सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नाना नेमकी कुणाला मदत करणार का भाजपचा उमदेवार जाहीर झाल्यावर नाना कोणता डाव टाकतात हे पाहावे लागणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »