तर ‘वंचित’कडून निवडणूक लढणार; हर्षवर्धन जाधव स्पष्ट बोलले



छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमकडून खासदार इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे उमेदवार असणार आहेत. त्यानंतर आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. हर्षवर्धन जाधव यांच्या घोषणेमुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषण केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मला संधी दिली तर मी ‘वंचित’कडून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. 2019 च्या निवडणुकीमध्ये जाधव यांनी घेतलेल्या मतामुळेच चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत देखील त्याचीच पुनरावृत्ती होते की काय हेही पाहणे महत्त्वाचं ठरेल.

दुसरीकडे विनोद पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची देखील भेट घेतली होती. मात्र कुठल्या पक्षाकडून ते निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी गुप्तता पाळली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचं राजकीय समीकरण कसं असेल आणि कुणाचं पारड जड ठरतं हे येणारा काळच सांगेल.

वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेणार?
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान राज्यातील काही जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. प्रकाश आंबेडकर यांच्या घोषणेमुळे वंचित बहुजन आघाडी कोण-कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे पाहावे लागेल. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून ‘वंचित’ कोणाला उमेदवारी देते, हे देखील पाहावे लागेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »